बुधवार, 25 दिसंबर 2019

ग्रहण म्हणजे काय ?

ग्रहण म्हणजे काय ?

साध्या सरळ भाषेत सांगायचं झालं तर ग्रहण म्हणजे सावल्यांचा खेळ. जेव्हा निरीक्षक सापेक्ष एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले असे म्हणतात. पण बोली भाषेत " ग्रहण " म्हणजे गिळंकृत करणे किंवा खाऊन टाकणे. पौराणिक कथांच्या अनुसार राहू नावाचा राक्षस सूर्य किंवा चंद्राला खाऊन टाकतो तेव्हा ग्रहण होते, आता ह्या जुनाट कल्पना सोडून आपण पुढे आलो आहोत आणि सर्वांना माहिती आहे की पृथ्वीवरुन जे ग्रहण दिसतात ते आपली पृथ्वी आणि चंद्र यांच्या सावली मुळे होतात.  

सूर्यग्रहण म्हणजे काय ?
जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. जेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा अमावस्या ही तिथी असते. म्हणजेच सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होते. पृथ्वीच्या ज्या भागांवर चंद्राची सावली पडते अशाच भागांवरून सूर्यग्रहण दिसते. जशी सावली पुढे पुढे सरकत जाते तसे संबंधित भागांवर त्या त्या वेळी सूर्यग्रहण दिसते.

सूर्यग्रहणाचे ३ प्रकार पुढील प्रमाणे आहेत -

-खग्रास सूर्यग्रहण -  खग्रास म्हणजे पूर्ण ग्रासणे. या वेळी सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो; या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात. चंद्र मध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडविला जाऊन तेथे चंद्राची गडद सावली (प्रच्छाया) पडते. पृथ्वीवरील गडद सावलीच्या भागांतूनच खग्रास सूर्यग्रहण दिसू शकते.

-खंडग्रास सूर्यग्रहण - खंडग्रास म्हणजे काही भाग ग्रासणे सूर्य हा आपल्याला जवळचा तारा असल्याने तो विस्तारित प्रकाशस्रोत आहे. चंद्र मध्ये आल्याने पृथ्वीवर येणारा सूर्यप्रकाश अडविला जाऊन जशी चंद्राची गडद सावली (प्रच्छाया) तयार होते, तशीच विस्तारित प्रकाशस्रोतामुळे प्रच्छायेभोवती फिकट सावली (उपच्छाया) देखील पडते. उपच्छायेमुळे खंडग्रास सूर्यग्रहण दिसते.

कंकणाकृती सूर्यग्रहण - 
चंद्राची पृथ्वीभोवतालची कक्षा थोडी लंबवर्तुळाकार असल्याने, चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर हे सतत थोड्याफार प्रमाणात बदलत असते. याचा परिणाम म्हणून चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा आकारही (कोनीय माप) बदलत असतो. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर जास्त असताना चंद्र पृथ्वी आणि सूर्य यांमध्ये एका रेषेत आल्यास चंद्राचे कोनीय माप हे सूर्यापेक्षा लहान झाल्याने सूर्य पूर्णपणे झाकला जात नाही. त्यामुळे चंद्रामागे झाकल्या गेलेल्या सूर्यबिंबाचा आकार बांगडीसारखा दिसतो. या स्थितीला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.
२६ डिसेंबर २०१९, रोजी होणार सूर्य  ग्रहण  कंकणाकृती अथवा  खंडग्रास   दिसणार आहे, तुम्ही सर्वानी ते नक्की पाहावं. मुंबई मध्ये हे ग्रहण  खंडग्रास दिसणार असून  भारतीय प्रमाण वेळेनुसार  सकाळी ८. ०४ मिनिटांनी सुरु होईल, पुढे ९. २१  मिनिटांवर अधिकाधिक ७८. टक्के सूर्याला झाकेल, ११.५५ मिनिटांवर ग्रहण पूर्णतः संपेल.
सूर्यग्रहण साध्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक असल्याने ग्रहणाचे चष्मे लावूनच, किंवा सूर्यबिंबाचे आरसा वापरून प्रतिबंबाचे भिंत किंवा पडद्यावर प्रक्षेपण करून पाहणे निर्धोक असते.

ग्रहण  शुभ कि अशुभ ?
मुळात ग्रहण शुभ किंवा अशुभ नसून ती एक खगोलीय घटना आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ह्या सावल्यांचा खेळाबद्दल अनेक अंधश्रद्धा भारतीय समाजात आहेत. जसे ग्रहण काळात देवी देवतांना पाहायचे नाही, काही खायचे नाही अथवा प्यायचे नाही कारण आन पाणी दूषित होते  , ग्रहण काळात उपवास करायचा, काही चिरायचे नाही तसेच सर्वत्र तुळशी पत्रे टाकली जातात . ह्या सर्व अंधश्रद्देच्या खेळात जास्त भरडल्या जातात  त्या गर्भवती महिला , त्या काळात गर्भवती महिलेला  दिवसभर उपवास करायला सांगितलं जात आणि त्या दोन जीवांना जर  उपाशी ठेवल तर वाढत्या  भ्रूणावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तसेच आणखी एक खुळचट कल्पना अशी कि ग्रहणात बुटक्या माणसाला खेचला कि त्याची उंची वाढते.    
     मुळात पृथ्वीपासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या ग्रह आणि उपग्रहांच्या सावलीखाली येण्यामुळे मानवी जीवनावर काही परिणाम होतो हा दावाच अनाकलनीय आहे. जयंत नारळीकरांसारख्या अनेक वैज्ञानिकांनी सांगून सुद्धा आपण त्यांचे मत  घ्यायला आणि विवेकी वागायला तयार नाही. आपण भारतीय लोक अश्या अंधश्रद्धांना लवकरात लवकर सोडून विज्ञानाची कास धरू तितक्या लवकर प्रगती कडे वाटचाल करू. 
  ग्रहणात  एक अंधश्रद्धा आहे ती ग्रहण सुटण्यासाठी दान मागण्याची. ते प्रत्येकाने असे ज्ञानाचे दान द्यावे की  अश्या अंधश्रद्धांच ग्रहण सुटून , अज्ञानाच्या दाट सावलीतून ज्ञानाच्या प्रकाशाकडे सर्वांना वाटचाल करणे सुकर होईल. 

*ग्रहणा विषयीच्या अंधश्रद्धा:*

❌१) ग्रहण काळात कुठले ही नवीन कार्य करणे वर्जित आहे. *(कुठलेही कार्य करायला ग्रहणामुळे अडचण येत नाही)*

❌२) ग्रहणा दरम्यान भोजन तयार करणे आणि जेवण करणे देखील वर्जित असते. *(जेवण तयार करून खाऊ शकतो)*

❌३) मल-मूत्र आणि शौच करू नये. *(केल्यास कोणताही अपाय होत नाही)*

❌४) देवी देवतांची मूर्ती आणि तुळशीला स्पर्श करू नये. *(स्पर्श केल्यास काहीही वाईट घडत नाही)*

❌५) दातांची स्वच्छता, केसांमध्ये कंगवा फिरवू नये. *(केल्यास कोणताही अपाय होत नाही)*

❌६) गर्भवती स्त्रीने ग्रहण पाहू नये, गर्भाला इजा होवू शकते. *(धादांत खोटे,गर्भाला काहीही होत नाही)*

❌७) ग्रहण काळातील ग्रहणामुळे दुषित झालेले उघडे अन्न, पाणी फेकून द्यावे. *( ग्रहण काळात पाणी दूषित होत असेल तर नदी, तलावाचे पाणी सुध्दा दूषित ? होणार मग ते पाणी कुठे फेकायचं ??? ग्रहणामुळे अन्न, पाणी दूषित होत नाही.)*

❌८) ग्रहण समाप्तीनंतर घराच्या शुद्धीकरणासाठी गंगाजल जरूर शिंपडावे. *(गरज नाही)*

*वरील सर्व गोष्टी थोतांड आहेत, त्यांना कुठलाही शास्त्रीय आधार नाही.*

*चला चुकीची कर्मकांडे बाजूला सारूया, आणि नयनरम्य सुर्यरग्रहणाचा आनंद घेवूया.*

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें